प्रशासकांकडून बजेट सादर
| सावंतवाडी | प्रतिनिधी |
येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्यानंतर शिलकी अंदाजपत्रक प्रशासनाने मांडले. यामध्ये अखेरची शिल्लक 35 कोटी 59 लाख 66 हजार 141 एवढी आहे. सावंतवाडी नगरपरिषदेवर 17 डिसेंबरपासून प्रशासक म्हणून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर काम पाहत आहेत. तर जयंत जावडेकर हे मुख्याधिकारी म्हणून प्रशासनाचा कारभार हाकत आहेत. प्रशासक पानवेकर यांनी हे अंदाजपत्रक सादर केले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच अंदाजपत्रक प्रशासकामार्फत मांडण्यात आले. नगरपरिषदेच्या अंदाज पत्रकात अखेरची शिल्लक 35 कोटी 59 लाख 66 हजार 141 एवढी आहे. अंदाजपत्रकात शहर विकासाच्या दृष्टीने आरोग्य, पाणी, रस्ते आणि स्वच्छता अभियान यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पालिकेच्या तिजोरीत भर टाकण्याच्या दृष्टीने भाडेवाढ, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील थकीत भाडे वसूल करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे.गेल्या दोन वर्षांत नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट होता. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत विशेष मोहीम राबविण्याची वेळ नगरपरिषद प्रशासनावर आली. कोरोना संकटाचा काळ असल्यामुळे शासनाकडून येणारा विकासात्मक निधीही ठप्प झाला होता. हंगामी कर्मचार्यांच्या पगाराबाबतही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. गेल्या चार महिन्यांपासून प्रशासक कारभार हाकत आहेत. या कालावधीत घरपट्टी शंभर टक्के वसुली, पाणीपट्टी शंभर टक्के वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तिजोरी पुन्हा भरू लागली.
घनकचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील भूसंपादन प्रस्ताव व मोजणी करून नगरपरिषदेच्या ताब्यातील मालमत्ता यांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीनेही अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. दरम्यान, शंभर टक्के घरपट्टी वसुलीसाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. बर्याच प्रॉपर्टी व दुकान गाळे घरपट्टी न भरल्याने सीलबंद करण्याचीही कारवाई करण्यात आली आहे.
मुलभूत गरजांकडे विशेष लक्ष
महिला कल्याणकारी योजना, प्रसाधनगृहे, ओपन जिम, जिमखाना मैदान खेळपट्टी विकासासाठी 12 लाख, साहित्य चळवळ व ग्रंथालय वृद्धीसाठी एक लाख रुपयांची तरतूद केली आहे. इन्डोअर गेममधील शुल्कवाढ, शिल्पग्राम जमीन भाडे, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे वसुलीकडे विशेष लक्ष देऊन नगरपरिषदेच्या तिजोरीत भर घालण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.