ग्रामस्थांना जमीन न विकण्याचे आवाहन
| नेरळ/कर्जत | प्रतिनिधी |
आमदार-खासदारांच्या निधनानंतर शोकसभा घेतली जाते; मग आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची कत्तल होत असताना त्यांची शोकसभा का होऊ नये? जंगल तोडून कसला विकास साधणार? महाराष्ट्राच्या बापजन्मात असे प्रकल्प आम्हाला नकोत. झाडे तोडणाऱ्यांना सोडणार नाही, आणखी झाडे तोडू देणार नाही, असा इशारा देऊन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी टोरंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात रणशिंग फुंकले. कर्जत तालुक्यातील साय डोंगरात तोडलेल्या वृक्षांची शनिवार, दि.7 रोजी शोकसभा घेत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. टोरंट कंपनीच्या गाड्या अडवा, लाखो लोकांनी या आंदोलनात उतरले पाहिजे, असे आवाहन करतानाच ग्रामस्थांना जमिनी न विकण्याचा आणि एकजूट कायम ठेवण्याचा निर्धारही त्यांनी दिला.

टोरंट पॉवरच्या प्रस्तावित पंप स्टोरेज विद्युत प्रकल्पासाठी पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील साय डोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीने पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटना या वृक्षतोडीविरोधात संघर्ष करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी साय डोंगराला भेट देत प्रत्यक्ष वृक्षतोडीची पाहणी केली. तोडलेल्या जुन्या वृक्षांची अवस्था पाहून ते भावूक झाले. झाडांचे रक्त आजही वाहात असल्यासारखे दिसत असून, ही केवळ वृक्षतोड नसून, असंख्य पक्षी आणि प्राण्यांचे अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जंगल तोडून विकास नको, असे ठामपणे सांगताना त्यांनी हरित ऊर्जेच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सूर्यप्रकाशासारखी प्रचंड ऊर्जा मोफत उपलब्ध असताना जंगलांचा विनाश करून हरित ऊर्जेचे प्रकल्प उभारण्याची गरज काय? नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवले जात आहे; मात्र हे केवळ थोतांड आहे. मी स्वतः प्रकल्पग्रस्त असून, मलादेखील चौकीदार म्हणून नोकरी करावी लागली होती, असा अनुभव त्यांनी सांगितला. जंगल म्हणजे केवळ झाडांचा समूह नाही, तर बुरशी, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण जैवसाखळीचा आधार आहे. जंगल नष्ट झाले तर ही साखळीच उद्ध्वस्त होईल. घरावर बॉम्ब टाकल्यासारखा हा प्रकार आहे, अशा शब्दांत त्यांनी वृक्षतोडीचे गांभीर्य मांडले.
आम्ही धरणासाठी जमीन देऊन होरपळलो आहोत. तोच अनुभव तुम्हाला येऊ नये, यासाठी तुम्हाला सावध करायला आलो आहे. तुम्ही जमिनी देऊ नका, मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी कर्जत पर्यावरण बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे, सह्याद्री बचाव समितीचे महेश भारती, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, ग्रामसंवर्धन समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पर्यावरणप्रेमी रोहिदास लोभी यांनी गाडगेबाबांची वेशभूषा करून भारुडातून ग्रामस्थांना जमिनी आणि वृक्षसंपदा वाचवण्याचे आवाहन केले. ’वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संदेश देत त्यांनी टोरंट प्रकल्प हटवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या भारुडाला ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
साय डोंगरातील वृक्षतोडीविरोधातील लढ्याला आता राज्यभरातून पर्यावरणप्रेमींचा पाठिंबा मिळत आहे. सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष जंगलात उतरून दिलेला आवाज आणि ग्रामस्थांना दिलेली साथ यामुळे टोरंट प्रकल्पाविरोधातील संघर्षाला नवे बळ मिळाले आहे.
जमिनी विकू नका, एकजूट ठेवा!
साय डोंगरातील शिवमंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधताना सयाजी शिंदे यांनी स्वतःच्या प्रकल्पग्रस्तपणाचा अनुभव सांगितला. सुमारे 40 वर्षांपूर्वी धरणासाठी आमची जमीन घेण्यात आली. त्यानंतर 30 वर्षे पर्यायी जमिनीच्या प्रतीक्षेत राहावे लागले. कागदावर जमीन दिली; मात्र प्रत्यक्षात आजही ती मिळालेली नाही. त्यामुळे थोड्याशा मोबदल्यासाठी आपल्या जीवाचा तुकडा देऊ नका. आज तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील; पण तुमच्या जमिनींची किंमत भविष्यात कोट्यवधी रुपये असू शकते. जमीन ही आपली आई आहे, आपण आपल्याच आईला विकणार का? असा सवाल त्यांनी केला. आम्ही धरणासाठी जमीन देऊन होरपळलो आहोत. तोच अनुभव तुम्हाला येऊ नये, म्हणून सावध करायला आलो आहे. तुम्ही जमिनी देऊ नका, एकत्र राहा, बाकी हा प्रकल्प येथून कसा हद्दपार करायचा ते आम्ही पाहतो. मी तुमच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. लाखो लोकांनी या लढ्यात सहभागी व्हावे, टोरंट कंपनीच्या गाड्या अडवाव्यात आणि आणखी झाडे तोडली जाणार नाहीत यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारच्या पर्यावरण धोरणावरही सवाल
सरकारने कोट्यवधी झाडे लावल्याचे सांगितले जाते; मात्र ती झाडे नेमकी आहेत कुठे? एका बाजूला वृक्षारोपणाच्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला शेकडो एकर जंगल उद्ध्वस्त करायचे, हा कोणता पर्यावरणपूरक विकास? पर्यावरणमंत्र्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी. मंत्र्यांना त्यांच्या खात्याचे तांत्रिक ज्ञान कितपत आहे, याचाही विचार व्हायला हवा, अशी टीका त्यांनी केली. चितळे समितीने कोकणात पाणी अडवणाऱ्या धरणांबाबत मांडलेल्या शिफारशी आणि पश्चिम घाटाबाबतच्या गाडगीळ समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यंदा झाडे तोडून दिवाळी साजरी करायची नाही, होळीही करू नका, असे आवाहन करत त्यांनी सर्व कलाकारांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.







