कर्जतमध्ये सयाजी शिंदेंचे आंदोलन

| नेरळ | प्रतिनिधी |

टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे शनिवारी (दि.7) कर्जत येथे येणार आहेत. सयाजी शिंदे यांनी मुंबईत परत्रकार परिषद घेऊन सह्याद्री वाचवण्यासाठी एकजुटीने उतरल्याचे जाहीर केले असून, त्यांची जाहीर सभा कर्जत येथील प्रसिद्ध लोकमान्य टिळक चौकात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यातील पाली सायडोंगर येथे सुरु असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यारवरणप्रेमी प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून कर्जत येथे येऊन वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यावर भर दिला जात असून अनेक निसर्गप्रेमी, कलाकार जंगलतोड विरोधात शड्डू ठोकून आहेत. यात भारतीय जीवन आणि पृथ्वी रक्षण चळवळ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीच्या विरोधात एल्गार केला असून, सह्याद्री वाचवण्यासाठी स्वतः कर्जतच्या जंगलात येऊन तोडलेल्या झाडांची अवस्था पाहणार आहेत. “सह्याद्रीमध्ये कोणतेही प्रकल्प नको असे सरकारी अहवाल असूनही सह्याद्री खोऱ्यात प्रकल्प आणले जात असतील, तर सरकारचे डोके नक्की फिरले आहे, असेच म्हणावे लागेल,” अशी टीका अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे कर्जत येथील जंगलतोडविरोधी आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी सयाजी शिंदे शनिवारी कर्जत येथे येणार आहेत.

Exit mobile version