खोपोलीतील महिंद्रा सॅनियो कंपनीत आढळले दुर्मिळ खवले मांजर

। खोपोली । विशेष प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्याची भौगोलिक संरचना जैव वैविध्यतेला पूरक असल्याने या परिसरात वेगवेगळ्या प्रजाती प्राणीमित्रांना आढळून येतात. खोपोली शहरातील महिंद्रा सॅनियो कंपनीच्या आवारात खवले मांजर दिसून आल्याची माहिती मंगळवारी (दि.6) रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान खोपोलीतील प्राणीमित्रांना मिळाली. त्या बाबीचे गांभीर्य जाणून घेत खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार आणि खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांना त्याबाबतची माहिती देऊन प्राणीमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली.

खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याचे कर्मचारी, पोलीस ठाण्याचे कर्मचारी, प्राणीमित्र आणि कंपनीचे सुरक्षा कर्मचार्‍यांनी खवले मांजरास सुरक्षिततेची खबरदारी घेऊन पकडले.कंपनीच्या आवारात आढळून आलेले खवले मांजर हे संपूर्ण वाढ झालेले साधारणतः 15 किलो वजनाचे होते. त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतल्यानंतर त्या घटनेचा रीतसर पंचनामा पूर्ण करून वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी खवले मांजराला ताब्यात घेऊन सुरक्षित वनक्षेत्रात मुक्त केले.

खवले मांजर हे अत्यंत दुर्मिळ असून पर्यावरणाच्या अन्न साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याचा आहार म्हणजे मुंग्या, कीटक आणि वाळवी असा असतो. ते निशाचर असल्याने सहसा त्याचा वावर रात्रीच असतो. कंपनीच्या शेजारी डोंगर आणि झाडी असल्याने भक्ष शोधण्याच्या नादात ते त्या ठिकाणी आले असल्याची माहिती तालुका वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.

खवले मांजर रेस्क्यू अभियानात प्राणीमित्र योगेश शिंदे,नवीन मोरे, अभिजीत घरत, ऋषभ पोपळभट, सुनील पूरी, योगेश औटी, निखिल ढोले, गुरुनाथ साठेलकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. वनपाल भगवान दळवी यांच्यासोबत त्यांचे सहकारी नितीन कराडे, बालाजी सूर्यवंशी, संतोषी बास्तेवाड तसेच पोलीस कर्मचारी वाय सी आव्हाड आणि डी पी खंदाडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

Exit mobile version