उरण, नागाव ग्रामपंचायतीत घोटाळा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

किरण केणी यांना हलगर्जीपणा भोवला; आदर्श ग्रामसेवका’चे निलंबन

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे अड्डे उघडपणे फोफावत असतानाच नागाव ग्रामपंचायतीतील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांनी लेखी तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही उरण पंचायत समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीला मुद्दाम टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरविलेले नागाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किरण केणी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नागाव ही उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते. मात्र याच गावात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार, फाईलींची अदलाबदल, खोटे दाखले, मंजुरीचे व्यवहार आणि निधीचा अनियमित वापर झाल्याच्या गंभीर तक्रारी ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पंचायत समितीकडे दाखल केल्या होत्या. पण तक्रारींना गांभीर्याने न घेता, चौकशी न करता, अर्ज काही दिवसांनी निकाली काढले असा शिक्का मारण्याचा उद्योग उरण पंचायत समितीत सुरू असल्याची चर्चा तालुक्याभर रंगू लागली होती. त्यामुळे उरणमध्ये पंचायत समितीतील अधिकारीच भ्रष्टाचार करणाऱ्यांची ढाल बनले आहेत का, असा सरळ प्रश्न स्थानिक पातळीवर विचारला जाऊ लागला.

तक्रारदारांना न्याय मिळत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे धाव घेतली. सातत्याने पाठपुरावा करत अखेर त्यांनी नागाव ग्रामपंचायतीची सखोल चौकशी सुरू केली आणि या तपासात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट निष्कर्ष समोर आले. या निष्कर्षावरून ग्रामसेवक किरण केणी यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती अधिकृतरित्या देण्यात आली.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्याच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन निलंबन होते, त्या किरण केणी यांना काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित केले होते. ग्रामस्थांच्या तक्रारींसह गंभीर आरोप प्रलंबित असताना असा पुरस्कार देण्यात आला कसा, यावरून जिल्हा परिषद प्रशासनावरही संशयाची छाया पडू लागली आहे. आदर्श ग्रामसेवक पुरस्कारही ठराविक व्यक्तींना देण्यासाठीच भ्रष्टाचार झाला का, अशी कानाफुसी आता उरणपासून रायगडपर्यंत सर्रास केली जात आहे. नागावचा घोटाळा आता उरणच्या प्रशासकीय व्यवस्थेतील पोकळपणा उघडा करत आहे. भ्रष्टाचार करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे यांची साखळी किती खोलवर गेली आहे, हे नागाव प्रकरणाने स्पष्ट केले आहे.

ग्रामसेवकांच्या कारभारावर लक्ष ठेवा
या सर्व घडामोडींनंतर उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नगरविकास मंत्र्याकडे ठोस मागणी केली आहे की, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कारभाराची पुन्हा एकदा सखोल चौकशी करावी. ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे किंवा ज्यांच्याविरुद्ध गंभीर अनियमितता आढळेल, त्यांचे पुरस्कार तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
Exit mobile version