शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

| पुणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पाचवीच्या 16 हजार 693, तर आठवीचे 16 हजार 587 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाबाबतची माहिती दिली. राज्यात 22 फेब्रुवारी रोजी पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. पाचवीच्या 6 लाख 57 हजार 176, आठवीच्या 3 लाख 87 हजार 627 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पाचवीच्या 6 लाख 36 हजार 580, आठवीच्या 3 लाख 73 हजार 961 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा 18 मे रोजी अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला. 18 ते 27 मे या कालावधीत गुणपडताळणीचे अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला.

परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, पाचवी आणि आठवी मिळून पात्र ठरलेल्या 2 लाख 32 हजार 29 विद्यार्थ्यांपैकी 22.97 टक्के म्हणजे 33 हजार 280 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाचवीचे 1 लाख 57 हजार 483 विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी 24.74 टक्के अर्थात 16 हजार 693 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तसेच आठवीचे 74 हजार 546 विद्यार्थी पात्र ठरले. त्यातून 16 हजार 587 विद्यार्थी (19.94 टक्के) शिष्यवृत्तीधारक ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून ज्या जिल्ह्यांत किंवा तालुक्यांमध्ये मंजूर संच संख्येच्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत, असे उर्वरित संच इतर जिल्हा किंवा तालुक्याला हस्तांतरित करून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. सीबीएसई, आयसीएसई आणि इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. शाळांना गुणपत्रकाची डिजिटल प्रत देण्यात आलेली असल्याने छापील गुणपत्रक वितरित केले जाणार नाही. शाळेने उत्तम प्रतीच्या कागदावर गुणपत्रकाची छापील प्रत काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी. केवळ शिष्यवृत्तीधारक, राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची रंगीत, छापील प्रमाणपत्रे यथावकाश शाळांना उपलब्ध करून दिली जातील, असे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version