जि.प. सदस्या भावना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
को.ए.सो. ना.ना. पाटील शिक्षण संकुल, पोयनाड येथे शिष्यवृत्ती परीक्षा इ.5 वी व 8 वीच्या केंद्रस्तरीय मार्गदर्शन शिबिराचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या वर्गाचे उद्घाटन जि.प. सदस्या तथा जिल्हा शिक्षण समिती सदस्या भावना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारंभप्रसंगी विस्तार अधिकारी शिक्षण रा.जि.प. संतोष शेडगे, ना.ना. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक कुलकर्णी, जिल्हा समन्वयक संदीप वारगे यांनी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांच्या संकल्पनेतून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना विशेष व मोफत मार्गदर्शन मिळावे याकरिता पथदर्शी तालुका म्हणून अलिबाग तालुक्याची निवड केली आहे. अलिबाग तालुका गटशिक्षणाधिकारी प्रकाश कोकाटे व सर्व केंद्रप्रमुख यांच्या सभेत अलिबाग तालुक्यात तीन विभागात शिष्यवृत्ती वर्गांचे आयोजन करण्याचे ठरले. त्यातील पहिल्या वर्गाचे उद्घाटन शनिवारी पेझारी येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सुरेंद्र पाटील, उदय ठाकूर, विश्वजित म्हात्रे, श्री. पांढरे, साधन व्यक्ती यामिनी पाटील, मनीषा पाटील, पेझारी शाळा मुख्याध्यापक नितीश पाटील आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी इ. 5 वीचे 63 व 8 वीचे 58 विद्यार्थी असे एकूण 121 विद्यार्थी व पालक, मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.का.पाटील, शाळा पोयनाड यांनी, तर आभार प्रदर्शन वैभव पिंगळे शाळा ताडवागळे यांनी केले.