शाळेच्या इमारती संरक्षक भिंतीविना

विद्यार्थ्यांसह-शाळेतील मालमत्ता वाऱ्यावर

| अलिबाग | प्रमोद जाधव |

अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेच्या 787 इमारती संरक्षक भिंतीविना आहेत. तसेच 189 शाळांच्या संरक्षक भिंती पक्क्या असूनदेखील त्या तुटलेल्या अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह शाळेतील मालमत्तेची सुरक्षा वाऱ्यावर आली असून शाळेचा परिसर भिंतीविना गुरांसाठी कुरणच बनले आहे.

शिक्षकांचा हक्क कायद्यानुसार शाळेची पक्की इमारत, शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, क्रिडांगण, तसेच संरक्षक भिंत आदी भौतिक सुविधा असणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा उभारणीपासून त्याठिकाणी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा आजही सुविधांपासून वंचित असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या सुमारे दोन हजार 566 शाळा असून नव्वद हजारापेक्षा अधिक विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेतील 702 संरक्षक भिंती पक्क्या आहेत. 189 संरक्षक भिंती पक्क्या असूनदेखील तुटलेल्या आहेत. तसेच187 शाळेला काटेरी व तारेचे कुंपण असून 787 शाळांना संरक्षणक भिंतीच नसल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहेत. अलिबाग, महाड, रोहा, सुधागड व उरण या तालुक्यातील फक्त सातच शाळांच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु आहे. ज्या शाळांमध्ये संरक्षक भिंती नाहीत, त्या शाळेतील विद्यार्थ्यांची व शाळेतील मालमत्तेची सुरक्षा वाऱ्यावर आहे.संरक्षक भिंती अभावी मागील तीन वर्षापूर्वी शाळेमध्ये चोरी झाली होती. संरक्षक भिंत नसल्याने शाळेचा परिसर मद्यपींसाठी अड्डा बनत आहे. काही ठिकाणी शाळेच्या परिसरातच रात्रीच्या वेळी क्रीकेटदेखील खेळले जात आहेत. विद्या मंदिरात सुरु असलेल्या या प्रकाराला रोखण्यासाठी संरक्षक भिंत महत्वाची असताना या ठिकाणी भिंती उभारण्यास जिल्हा परिषद शिक्षण विभाग उदासीन ठरत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या कारभाराचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांना बसत आहे.

तारेच्या काटेरी कुंपणाचा धोका
जिल्ह्यातील 187 शाळांना काटेरी तारेची कुंपण आहे. या कुंपणामुळे विद्यार्थ्यांना इजा होण्याची भिती अधिक आहे. त्याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शाळांच्या संरक्षण भिंतीवर दृष्टीक्षेप
पक्के – 702
पक्के पण तुटलेले – 189
काटेरी तारांचे कुंपण – 187
संरक्षक भिंत नाही – 787
बांधकाम सुरु असलेले – 7

शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद सेस व सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जातो. तसेच ग्रामपंचायतींनी संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे परिपत्रक आहे.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version