स्टुडंट्स लीडरशीप डेव्हलपमेंट कॅम्पचा पुढाकार
| उरण | वार्ताहर |
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी स्टुडंट्स लीडरशीप डेव्हलपमेंट कॅम्प (एसएलडीपी) च्या तरुणांनी ‘पुलाखालची शाळा’ या अनोख्या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. घणसोली नोड येथील उड्डाणपुलाखाली वास्तव्यास असणार्या चिमुकल्यांपासून त्याची सुरुवात झाली आहे.
शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांना किमान प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. घणसोली नोड येथील पुलाखाली बरेच दिवस काही विस्थापित लोक बांबूच्या टोपल्या तयार करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. आपली पोटाची खळगी भरण्यासाठी संपूर्ण कुटुंब कामाला लागले असताना लहानगे मात्र या ठिकाणी दिवसभर हुंदडताना दिसतात. घरातील कोणी ज्येष्ठ व्यक्ती किंवा त्यांच्यापेक्षा वयाने मोठी मुले त्यांना सांभाळतात. वास्तविक इतर मुलांप्रमाणे शाळेत जाण्याचे त्यांचे वय असताना त्यांना शैक्षणिक आनंदापासून वंचित राहावे लागत आहे. अशा बालकांना एकत्रित करीत त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत, त्यांचा विश्वास संपादित करीत स्टुडंट्स लीडरशीप डेव्हलपमेंट कॅम्प (एसएलडीपी) च्या सदस्यांनी पुलाखालची शाळेचा वर्ग भरविला.
सदर विद्यादानाचे काम हे संस्कृती संतोष हुगे, कमल राम नारायण, पूजा बाळासाहेब मगर, अक्षदा शंकर बाचुळकर, प्रज्ञा ज्ञानेश्वर पगारे हे स्टुडंट्स लीडरशिप डेवलपमेंट कॅम्पचे प्रतिनिधी करत आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांना चांगल्या वसतिगृहात दाखल करण्याचा या तरुणांचा मानस आहे, अशी माहिती ह्या सर्व होतकरू तरुणांकडून देण्यात आली आहे.
आठवड्यातून दोन दिवस शाळा
मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून स्टुडंट्स लीडरशिप डेवलपमेंट कॅम्पमार्फत बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस पुलाखाली शाळा भरवण्यात येते. त्यात बालकांना अक्षर ओळख होण्याआधी सध्या कोर्या कागदाच्या वह्या, पेन्सिल, रबर, रंग देऊन त्यांच्याकडून चित्रकलेचे धडे गिरविण्यास सुरुवात झाली आहे. मुलांच्या संकल्पनेतून निळा डोंगर, लाल सूर्य, उडणारे पक्षी यांसह अन्य काही चित्रे आकारास येत आहे.