खांडपे-कोंडिवडे रस्त्याची दुरुस्ती सुरु; सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला जाब
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोंदीवडे-खांडपे रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.8) ऑगस्ट रोजी छत्रीला माईक करून पत्रकारांच्या भूमिकेत विद्यार्थिनींनी रस्त्याची दुरवस्था मिश्कील शैलीत मांडली. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होताच प्रशासन जागे झाले आहे.
ज्योत्स्ना घारे ही विद्यार्थिनी आपल्या गावाच्या रस्त्याची बाजू रिपोर्टर म्हणून मांडत होती तर कॅमेरामन म्हणून मानसी पवार हिने जबाबदारी पार पाडली होती. त्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओ बनवणाऱ्या शालेय मुली या प्रसिद्धीचे झोतात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारकडून या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला गेला असल्याचे बोलले जात होते. सोमवारी (दि.10) ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावर पडलेले खड्डे कमी करण्यासाठी जेसीबी मशीन यांचा वापर करण्यात आला. ब्लेड मारून राहिलेले खड्डे जेएसबीच्या सहाय्याने खडी टाकण्यात आली आणि रोलर फिरवून रस्ता सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्यावर मे महिन्यात खडी टाकून रस्ता दुरुस्त केला होता, पण पावसाळ्यात रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्ता खराब झाला होता.
पावसाळा संपल्यानंतर या मार्गाचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या कायम असून, नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम मंजूर आहे. त्या ठिकाणचा रस्ता पावसाळ्यानंतर मजबूत केला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागांनी दिली आहे. आ. थोरवे यांनी रस्त्याची दुरुस्ती करून रस्त्याच्या कामासाठी तत्काळ निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
चिंचवली-चांदइ-कडाव-तांबस-जांबिवली-दहिवली-कोंदिवडे असा राज्यमार्ग रस्ता असून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम मंजूर आहे. त्या ठिकाणचा रस्ता पावसाळ्यानंतर मजबूत केला जाईल.
राहुल देवांग,
उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
