राज्यात सरसकट शाळा होणार सुरु?

शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत
पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत हालचाली
मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून, कोरोनाचे नियम पाळत महाविद्यालयांनाही परवानगी देण्यात आली आहे. आता राज्यात सरसकट पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. याबाबत वर्षा गायकवाड लवकरच मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सबरोबरही चर्चा करणार आहेत.
वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा आढावा घेतला. राज्यात शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. या तीन आठवड्यांचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू कराव्यात, अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मांडली. सध्या राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.
त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार आणि टास्क फोर्सशी चर्चा करणार असून, त्यानंतर राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय होणार आहे.

Exit mobile version