नवघर शाळेत विज्ञानाचा जागर

प्रयोगांतून उलगडले विज्ञानाचे कुतूहल

। पाली /बेणसे । प्रतिनिधी ।

‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चे औचित्य साधून नवघर शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई येथील सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक आणि सुधागडचे सुपुत्र करुण हंबीर यांच्या प्रत्यक्ष प्रयोगांच्या सादरीकरणामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘विज्ञानमय’ ठरला.

करुण हंबीर यांनी अतिशय सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने विविध वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने हवेचा दाब आणि पोकळी,पाण्याची गती व शुद्धीकरण (शुद्ध व अशुद्ध पाणी), वर्तुळाकार गती: आपकेंद्री बल आणि अभिकेंद्री बल, ध्वनी व लहरींचे शास्त्र, ऍसिड (आम्ल) संदर्भातील प्रयोग प्रात्यक्षिक दाखवले. हंबीर यांनी केवळ प्रयोग दाखवले नाहीत, तर त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे आणि निष्कर्ष मुलांच्या सहभागातून काढून घेतले. प्रयोगांमधील ‘वैज्ञानिक गंमत’ अनुभवताना विद्यार्थी भारावून गेले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका संगीता बैकर यांनी करुण हंबीर यांचे स्वागत केले. विषयशिक्षिका वृषाली गुरव यांनी हंबीर सरांचा परिचय करून देताना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले.

या विज्ञान सोहळ्यासाठी केंद्रप्रमुख अनिल राणे उपस्थित होते. तसेच केंद्रातील आसरे कासारवाडी मुख्याध्यापक प्रशांत गुरव आणि भालगुल शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक रुपाली लेंडवे आणि अंकिता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा वापर आणि त्यामागील कार्यकारणभाव समजल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची गोडी वाढण्यास मदत झाली, अशी भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.

Exit mobile version