बोगस डॉक्टरांची शोध मोहीम

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टरांवर कारवाईस सुरुवात करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे व पनवेल येथील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेमार्फत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती व संबंधित कागदपत्रे आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने बोगस डॉक्टर शोध मोहीम कारवाईला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रभाग अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकामार्फत खासगी वैद्यकीय व्यावसायीकांच्या मेडिकल कॉन्सिलची नोंदणीची कागदपत्रे, वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र व बायोमेडीकल वेस्ट प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल, मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ होमियोपॅथी व महाराष्ट्र डेंटल कॉन्सिल या वैद्यक परिषदेकडे नोंदणी नसलेल्या खासगी वैद्यकीय व्यावसायीकास बोगस डॉक्टर घोषित करण्यात येईल व त्या डॉक्टरावर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याकरिता सर्व खासगी व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

Exit mobile version