हजारो एकर शेतजमीन नापीक, खारभूमी सर्वेक्षण विभागाचे दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील खोपटा, आवरे, पिरकोन, गोठवणे, चाणजे, वशेणी, पुनाडे, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्या शेतजमीनीत समुद्राचे खारे पाणी शिरत आहे. त्यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील अधिकाऱ्यांनी बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी शेतकरी करत आहे.
उरण परिसरातील पुर्व विभागातील व चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांचे उपजिविकेचे साधन भातशेती आहे. परंतु, गेली अनेक वर्षे खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे न केल्याने समुद्रातील खारे पाणी भात शेतीत शिरत आहे. त्यात जेएनपीए व करंजा बंदरात या अगोदर करण्यात आलेल्या दगड मातीच्या भरामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी हे सातत्याने भात शेतीत शिरत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे उपजिविकेच साधन धोक्यात येत असताना, शासन पुन्हा एकदा चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील 100 एकर जागेवर भराव टाकून मल्टिमाँडेल लाँजिस्टीक पार्क उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी एमआयडीसी आणि मेरिटाईम बोर्डाने जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे चाणजे, खोपटा, गोवठणे, वशेणी, पुनाडे, आवरे, पिरकोन, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील उरल्यासुरल्या भात शेतीत उधाणाचे पाणी शिरुन खारफुटीचे जंगल वाढण्याचा तसेच भातशेती नापीक होण्याचा संभव आहे. तरी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील अधिकाऱ्यांनी पाहणी करून बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील विजय पाटील कार्यकारी अभियंता यांच्याकडे उरण तालुक्यातील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु निधी उपलब्ध होऊ न शकल्याने ती कामे रेंगाळत पडली आहेत. तरी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.
-सत्यवान भगत,
तालुकाअध्यक्ष, मनसे, उरण
उरण तालुक्यात काही अंशी बांध दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच खोपटा परिसरातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर सतत प्रयत्न केले जात आहेत. लवकरच ही कामे मार्गी लागतील.
-खारभूमी सर्वेक्षण
व
अन्वेषण विभाग पेण
