फुटलेल्या खांडींची अधिकार्यांनी केली पाहणी
हजारो एकर शेती नापीक होण्याची भीती
| चिरनेर | वार्ताहर |
फुटक्या खारबंदस्तीमुळे उरण तालुक्यातील उर्वरित शेती ही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या 30 नोव्हेंबरच्या सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर खारभूमीच्या अधिकार्यांची झोप उडाली. आणि त्यांनी 3 डिसेंबर रोजी तातडीने या फुटलेल्या खार बंदिस्तीची पाहणी करून, वस्तुस्थिती जाणून घेतली.
उरण पूर्व विभागात जी काही शिल्लक राहिलेली शेतजमीन खारभूमीच्या आणि मिठागराच्या फुटक्या बांधबंदिस्तीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खोपटे गावाजवळील ही खार बंदिस्ती फुटलेली आहे. याबाबत सुरुवातीला खारभूमीचे अधिकारी ही फुटलेली खारबंदिस्ती मिठागर विभागाची असल्यामुळे आम्हाला हे काम करता येत नाही, असे सांगून जबाबदारी झटकण्याचे काम करत होते. मात्र, या खारभूमीच्या खारबंदिस्तीलाच दोन ठिकाणी खांडी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांना जाग आली. यापैकी एक खांड जवळ जवळ 100 मि.ची असून, दुसरी खांड 25 मीटरची असल्याचे निदर्शनास आले आहे.
या दोन खांडींमुळे भरतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा शेतीमध्ये येतो. आणि हे पाणी गोवठणे, पिरकोन, पाणदिवे, कोप्रोली, पाले आणि खोपटे येथील गावांमधील शेतीमध्ये पसरते. आता हे पाणी खोपटे गावाच्या घरापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या भागातील हजारो एकर शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकदा खांडीचे पाणी शेतीमध्ये शिरले की चार वर्षे तरी या शेतीमध्ये पीक उगवत नाही. तसेच पाण्यासोबत वाहात आलेल्या खारफुटीच्या बियांमुळे शेतात खारफुटी उगवते.
दरम्यान, खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी आपल्या सहकार्यांसोबत हा पाहणीचा दौरा केला. ज्या ठिकाणी खांडी गेल्या आहेत, त्या ठिकाणी पोहोचणे अवघड झाल्यामुळे या अधिकार्यांनी होडीतून प्रवास करत पाहणी केली. या ठिकाणी दोन खांडी पडलेल्या असून, येथे असलेल्या उघडी देखील फुटल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.