राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पॅरा संघ द्वितीय

। तळा । वार्ताहर ।
पुष्कर, राज्यस्थान येथे चालू असणार्‍या माजी मुख्यमंत्री जनार्दनसिंह गहलोत याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कबड्डी संघाने चांगली कामगिरी करत महाराष्ट्र दिव्यांग कबड्डी संघ द्वितीय तर मुंबई दिव्यांग कबड्डी संघाने तृतीय स्थान प्रस्थापित केले. अंतिम फेरीतील महाराष्ट्र व राजस्थान या संघाच्या चुरसीच्या सामन्यात राजस्थान संघाने महाराष्ट्र संघास 41-40 अशा फरकाने प्रथम क्रमांकाचे स्थान व महाराष्ट्राने द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकाविले तर मुंबई संघ आणि राजस्थान संघाच्या उपांत्य सामन्यांत राजस्थान संघाने मुंबई संघास 47-38 या फरकाने हरविले. गुणानुसार मुंबई संघाने तृतीय स्थान व पंजाब संघास चतुर्थ स्थान प्राप्त केले. पेण तालुक्यातील कारवी गावातील राजेश मोकल यास बेस्ट रायडर म्हणून पारितोषिक देण्यात आले तर रोहा तालुक्यातील अक्षय निकम याने ही चांगली कामगिरी केली आहे. या संघाला कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष शशांक हिरवे, सचिव शिवाजी पाटील, गडब गावातील माजी सरपंच नितिन पाटील, रमेश म्हात्रे, अजय म्हात्रे, मनोज म्हात्रे, अतुल पाटील, संकल्प अपंग संघचे सचिव बाबाराव धोत्रे, बाबु सय्यद मुंबई यांनी सहकार्य केले.

Exit mobile version