। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत आणि वस्ती इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने 1-0 अशा फरकाने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला. सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे सोमवारी (24 जुलै) खेळ होऊ शकला नाही. दरम्यान, सिराजला सामनावीर, अष्टपैलू खेळ करणारा आर. अश्विनी आण पदार्पणात शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला मालिकावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रविवारचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजच्या 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्याला 289 धावांची गरज होती. त्याचवेळी भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज होती. मात्र, एकही खेळ होऊ शकला नाही. अशा स्थितीत भारताला 1-0 वर समाधान मानावे लागले. भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला. अशा स्थितीत टीम इंडियाला 183 धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव 2 बाद 181 धावा करून घोषित केला आणि एकूण 364 धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला 365 धावांचे लक्ष्य मिळाले.
पाचव्या दिवशी पावसाने कहर केला. रविवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाचव्या दिवशी सामना अर्धा तास आधी नियोजित करण्यात आला. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होता, पण तेव्हापासून मुसळधार पाऊस पडत होता. रात्री 9.30च्या सुमारास दुपारचे जेवण घेण्यात आले. तोपर्यंत पाऊस थांबला होता आणि कव्हर्स काढली होती. सामना सुरू होणार तेवढ्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि खेळपट्टी पुन्हा कव्हर्सने झाकली गेली. यादरम्यान अनेकवेळा पावसाचा हा लपंडाव सुरु होता. असे अनेकवेळा घडले की, कव्हर काढले गेले आणि लगेचच पाऊस सुरू झाला. अशा स्थितीत रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर अंपायर्सनी पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आणि रविचंद्रन अश्विन, यशस्वी जैस्वालला सामन्याचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.
भारताचे नुकसान, पाकचा फायदा
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली दुसरी कसोटी पावसामुळे रद्द करावी लागली. या निर्णयामुळे पाकिस्तानचा मात्र फायदा झाला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2023-25 पर्वात ते अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. पाकिस्तान 100 टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहाचला, तर भारताला 66.67 टक्क्यांमुळे दुसऱ्या स्थानी घसरण झाली. ऑस्ट्रेलिया ( 54.17) व इंग्लंड ( 29.17) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. विंडीजने 16.67 टक्क्यांसह पाचव्या स्थानी झेप घेतली.
मालिका जिंकली, पण गुण गमावले
टीम इंडियाने वेस्ट इंडिजमध्ये सलग पाचवी कसोटी मालिका आणि विंडीज संघाविरुद्धची सलग नववी मालिका जिंकली. 2002 पासून टीम इंडियाने त्यांच्याविरूध्द एकही कसोटी गमावलेली नाही. असे असूनही भारतीय संघाचे नुकसान निश्चितच झाले. सामना अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पूर्ण 12 गुण मिळाले नाही. त्यांना केवळ 4 गुणांवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर विंडीज संघालाही 4 गुणांसह खाते उघडण्याची संधी मिळाली.
27 जुलैपासून एकदिवसीय मालिका
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 29 जुलैला, तर तिसरा 1 ऑगस्टला खेळविण्यात येणार आहे. सुरुवातीचे दोन सामने बार्बाडोस येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर, तर तिसरा सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी मैदानावर खेळवला जाईल. एकदिवसीय सामन्यानंतर 3 ते 13 ऑगस्टदरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे.