Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

बॉम्बस्फोटाचा कट उधळला; आयएसआयच्या नऊ जणांना अटक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्याचा मोठा दहशतवादी कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि मुंबई अंडरवर्ल्ड नेटवर्कशी संबंधित नऊ संशयितांना शनिवारी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील असून, काही परदेशी नागरिकांचाही त्यामध्ये समावेश आहे. हे संपूर्ण मॉड्यूल पाकिस्तानस्थित आयएसआय आणि अंडरवर्ल्डमधील सूत्रधारांच्या निर्देशानुसार कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील अणुऊर्जा केंद्रे, प्रमुख विमानतळ, रेल्वे स्थानके, वीज निर्मिती केंद्रे, सुरक्षा दलांचे जवान आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये यांना लक्ष्य करण्याची जबाबदारी या गटावर सोपविण्यात आली होती. दिल्ली आणि मुंबईतील गर्दीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून हे मॉड्यूल सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होते. गुप्त पाळत आणि तांत्रिक तपासाद्वारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी समन्वित कारवाई करत सर्व आरोपींना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी आयएसआय आणि मुंबई अंडरवर्ल्ड नेटवर्कच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील महत्त्वाच्या आस्थापनांवर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

दिल्लीत हाय अलर्ट
या कारवाईनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मध्य दिल्लीतील गर्दीची ठिकाणे, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक स्थळांवर आत्मघाती हल्ले, वाहनांमधून आयईडी स्फोट किंवा अंदाधुंद गोळीबार घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व जिल्हा पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, केंद्रीय सुरक्षा दलांशी समन्वय वाढविण्यात आला आहे. प्रमुख रेल्वे स्थानके, विमानतळ, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
टेरर फंडिंगचा तपास सुरू
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे सीमापार संबंध, टेरर फंडिंगचे स्रोत, तसेच पाकिस्तान आणि इतर देशांत बसून या कटाचे सूत्र हलविणाऱ्या मुख्य हँडलर्सचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी व्यापक चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'या' संंवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याचा होता कट
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अणुऊर्जा प्रकल्प, वीज निर्मिती केंद्रे, विमानतळ, रेल्वे स्थानके, सुरक्षा दलांचे तळ तसेच महत्त्वाची सरकारी कार्यालये या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून मोठी जीवितहानी घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.
पाकिस्तानमधून पाठवलेली स्फोटके जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये पाकिस्तानमधून पाठवण्यात आलेली स्फोटके, ग्रेनेड्स आणि अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी या साहित्याचा वापर होणार असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
Exit mobile version