Neral Dam: नेरळमधील सर्व धबधब्यांवर बंदोबस्त

बारा दिवसांत दोन पर्यटकांचा मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यात चार महिने हजारो पर्यटक येत असतात. तसेच, पावसाळ्यात वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे अपघात होऊ नये, यासाठी नेरळ पोलिसांनी परिसरात असलेल्या धबधब्यांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. तरीदेखील पर्यटकांच्या अतिउत्साही पणामुळे गेल्या 12 दिवसांत दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नेरळ येथील जुम्मापट्टी, टपाल वाडी, आनंदवाडी, फणसवाडी, आंबेवाडी, ममदापूरवाडी, बेडीसवाडी व पाषाने इत्यादी ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. अनेकदा अतिउत्साही पणामुळे अपघात देखील होतात. त्यामुळे नेरळचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी सर्व धबधब्यांवर शनिवार-रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्याचवेळी दोन पोलीस हे दुचाकीवरून पहारा ठेवत आहेत. मात्र, दिवसभर सुरू असलेली वाहतूक कोंडी सोडवण्याची मोठी जबाबदारी देखील नेरळ पोलिसांच्यावर होती. याचदरम्यान, नेरळमधील दोन धबधब्यांवर वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांचे बळी गेले आहेत. त्यातील वांगणीतील बेडीस गावाजवळील भागीरथी धबधबा परिसरात एक युवक पाण्यात बुडाला होता. बदलापूर येथील सह्याद्री रेस्क्यू टीम कडून मदतकार्य सुरू होते. मात्र, सततचा मुसळधार पाऊस, पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि प्रतिकूल हवामानामुळे सर्वतोपरी प्रयत्न करूनही शोधकार्य यशस्वी होऊ शकले नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. बदलापूर येथून स्पीड बोट मागवून तिच्या साहाय्याने शोधकार्य अधिक व्यापक पद्धतीने राबविण्यात आले. सायंकाळी सुमारे साडेचार वाजता स्पीड बोटीच्या मदतीने शोधकार्य सुरू झाले आणि सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू पथकाला यश आले. पाण्यात बुडालेली तरुणाचे नाव ओमप्रकाश शाहू असे होते. याचवेळी नेरळ जवळील टपाल वाडी येथे एका तरुणाचा धबधब्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Exit mobile version