। मुंबई । वृत्तसंस्था ।
जम्मूमध्ये दहशतवादी कारवायांसाठी ड्रोनमधून संरक्षण दलाच्या तळावर बॉम्ब टाकले जात आहेत; मात्र महाराष्ट्रात सामाजिक वनीकरणासाठी डोंगरमाथ्यावर सध्या ड्रोनमधून सीड बॉल्स फेकले जाते आहेत. राज्याच्या वन विभागाने ड्रोनच्या मदतीने जव्हार, किल्ले राजगड, शिवनेरीवर हवाई बीज पेरणीचा प्रयोग राबवला आहे. आता राज्याच्या इतर भागातही ड्रोनमधून देशी झाडांच्या बियांची पेरणी होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक वनीकरणासाठी ड्रोनचा वापर करण्याची सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी राज्याच्या वन विभागाने सुरू केली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जव्हार परिसरात सुमारे 300 हेक्टर परिसरात ड्रोनमधून हवाई बीज पेरणी झाली. शिवनेरी, राजगड किल्ल्यांच्या परिसरात ड्रोनमधून सीड बॉल्स टाकले. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवला जात आहे. सुमारे अर्ध्या तासात हवाई बीज पेरणी होते. जव्हारमध्ये यासाठी तीन ड्रोनचा वापर केला होता. पाऊस आल्यावर नांदेडच्या माहुर गडावर ड्रोनमधून सीड बॉल्स टाकण्यात येतील.
डोंगरमाथ्यावर, दुर्गम भागात वनीकरणासाठी कामगार नेणे, खड्डे खोदणे खर्चिक असते. त्यामुळे दुर्गम भागात ड्रोन उडवले जाते. तुलनेत खर्चही कमी येतो. एका ड्रोनमधून सुमारे आठ ते दहा किलो वजनाचे सीड बॉल्स नेणे शक्य असते. ड्रोन साधारणपणे दहा फुटांपर्यंत खाली आणून सीड बॉल्स फेकले जातात. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या बिया टाकतात.
प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात येत आहे. ड्रोनमधून कडूलिंब, आपटा, वड, पिंपळ आंबा, करंज, बेहडा, मोह, जांभूळ, पळस, फणस, बांबू अशा झाडांच्या बियांच्या टाकल्या जातात. – प्रदीप कुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन विभागचांगल्या दर्जाची माती व शेणखतामध्ये झाडाचे बी टाकून त्याचे गोळे करतात. हे गोळे जंगलात टाकतात. पाऊस पडल्यावर मातीच्या गोळयांमधील बियांना अंकुर फुटतो. कालांतराने ही रोपे जागेवर रुजतात.