मूल्यांकनाच्या गुणांसह तालुकानिहाय पडताळणी पूर्ण
| रायगड | प्रतिनिधी |
दरवर्षी पाच सप्टेंबरला देण्यात येणाऱ्या तालुकानिहाय 15 जिल्हा शिक्षक पुरस्कारांची निवड आता अंतिम टप्प्यात आहे. या पुरस्कारासाठी मागील आठवड्यात आलेल्या प्रस्तावांचे तालुकास्तरावर मूल्यांकन करून शिक्षकांची तालुकानिहाय माहिती आणि क्रॉस तपासणी पूर्ण झाले आहे. मूल्यांकन केलेले गुण यांची गोपनीय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी कोकणभवन येथे पाठविलेली आहे. लवकरच या माहितीची पडताळणी करून त्याआधारे गुणवत्तेनुसार प्रत्येक तालुक्यातील एक अशा 15 प्राथमिक शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.
दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 15 शिक्षकांची निवड करण्यात येते. यासाठी संबंधित शिक्षकांनी भरून दिलेल्या माहितीची क्रॉस पडताळणी करण्यात येते. या पुरस्कारासाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाईटची निर्मितीवर त्यावर केलेले लिखाण, शैक्षणिक युट्यूब चॅनलची निर्मिती, वेगवेगळ्या पातळीवर प्रकाशीत केलेले विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, इस्त्रोसहल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढसाठी केलेले विविध प्रयोग, इंग्रजी माध्यमातून झेडपीच्या शाळेत विद्यार्थी येण्यासाठी केलेले प्रयोग यासह अन्य शैक्षणिक कामगिरी यांचे मूल्यमान या पुरस्कारासाठी करण्यात येते.
रायगड जिल्ह्यात 15 तालुके आहेत. काही तालुक्यातून दोन तर काही तालुक्यातून तीन अशा 29 शिक्षकांचे पुरस्कारासाठी प्रस्ताव शिक्षण विभागकडे प्राप्त झाले होते. या प्राप्त पुरस्कारांचे मूल्यांकन तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या समितीकडून क्रॉस तडताळणी करण्यात आली आहे. त्यानूसार गुणाकंन करून त्यांची गोपनिय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी शिक्षकांचे आलेले पुरस्करसाठीचे प्रस्ताव आणि मूल्यांकनाच्या गुण तालिका कोकण भवन येथे सादर करण्यात आली आहे. या यादीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 15 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.