| अलिबाग | प्रतिनिधी |
पिंपळभाट येथील समर्थनगर परिसरातील दोन दुचाकी भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. ही घटना गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. दुचाकी मालकाने रात्रीचा दिवस करून दुचाकीचा शोध घेतला. अखेर अलिबाग एसटी स्थानक व पिंपळभाट परिसरात झुडपाजवळ शुक्रवारी सायंकाळी सापडली.
मोहन लोगडे यांनी त्यांची दुचाकी पिंपळभाट परिसरातून असलेल्या स्वयंभू बंगल्याच्या आवारात गुरुवारी पार्कींग करून ठेवली होती. तसेच बाजूला असलेल्या इमारतीच्या परिसरात हार्लीकर यांनी त्यांची दुचाकी पार्किंग करून ठेवली होती. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भुरट्या चोरट्याने परिसरातील बंद असलेली घरे फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दोन दुचाकी लंपास केल्या. दुचाकी मालक मोहन लोगडे यांनी त्यांच्या मालकाच्या मदतीने दुचाकीचा शोध घेतला. शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळात दुचाकीची शोधाशोध सुरु केली. त्यावेळी सायंकाळच्या सुमारास अलिबाग एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच लोगडे यांची दुचाकी दिसून आली. तसेच पिंपळभाटमधील झुडपानजीक हार्लीकर यांची दुचाकी सापडली.