खड्ड्यांसह वाहतूक कोंडीने हैराण
| अलिबाग | प्रतिनिधी |
पेण-पनवेल मार्गावर शनिवारी दुपारी झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका चालकांसह प्रवाशांना बसला. खरसई पासून ते खारपाडा पूल अशा सुमारे तीन किलोमीटर अंतरा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पनवेलकडून पेणकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पेणकडून पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू ठेवल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले.

पेण-पनवेल मार्ग कायमच चर्चेत आहे. महामार्गावरील खड्डे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला गवतांचे झुडूप असे अनेक प्रश्न निर्माण होत असताना शनिवारी दुपारी पेण ते पनवेल मार्गावरील खरसई ते खारपाडा पूलपर्यंत वाहतूक कोंडी झाली. मोठ्या वाहनांसह दुचाकी वाहन चालकांना देखील त्याचा फटका बसला. पेणकडून पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने मुंबईचे पर्यटक अलिबागकडे सुटटीचा आनंद लुटण्यासाठी निघाले होते. तर अलिबाग, पेण तसेच दक्षिण रायगडमधील काही नागरिक मुंबई , बोरीवली, ठाणेकडे निघाले होते. सकाळ पासून या मार्गावर वर्दळ वाढली होती. मात्र रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरु आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर झाल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. .