वुमेन्स लीगच्या पूर्वतयारीसाठी निवड चाचणी

। पोयनाड । वार्ताहर ।
रायगड प्रीमिअर लीगने आयोजित केलेल्या विमेन्स क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पोयनाडच्या झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर व दोन सराव सामन्यांचे आयोजन केले होते. संपूर्ण रायगड जिल्ह्यातून 40 मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.
एमडीए फियूचर स्कूल, कोलाडच्या मैदानावर निवड चाचणी करून नोंदणीकृत झालेल्या सर्व मुलींना विविध संघांमध्ये विभागून त्यांच्यामध्ये रायगड विमेन्स प्रीमिअर लीग स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील मुली अनेक ठिकाणी मुलांच्या संघातून खेळताना दिसतात. त्यांची क्रिकेट खेळातील कामगिरीदेखील उत्तम असते. अशा व अन्य सर्व क्रिकेट खेळणार्‍या मुलींना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. म्हणूनच रायगड प्रीमिअर लीगच्या समितीने पुढाकार घेऊन रायगड जिल्ह्यातील होतकरू मुलींसाठी विमेन्स प्रीमिअर लीगचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
स्पर्धेच्या आधी पूर्वतयारी म्हणून पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर व दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले. भविष्यात रायगड जिल्ह्यातील मुलांच्या बरोबर मुलीदेखील चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळल्या पाहिजेत यासाठी शर्थीचे प्रयत्न आरपीएल करणार आहे. पोयनाड येथील दोन दिवसीय शिबिरासाठी आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, डॉ. राजाराम हुलवान, संदीप जोशी, शंकर दळवी, प्रीतम पाटील, महेंद्र भातिकरे, कौस्तुभ जोशी, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, किशोर तावडे, दीपक साळवी, अजय टेमकर, सुजित साळवी, अ‍ॅड. पंकज पंडित, प्रशिक्षक सागर सावंत, ऋषिकेश कर्नुक, उमाशंकर सरकार, संकेश धोळे, आदेश नाईक उपस्थित होते.

Exit mobile version