। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कुसुंबळे येथील शेकापचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक गणू पाटील यांचे दि. 2 ऑगस्ट रोजी वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, जि.प. माजी सदस्या चित्रा पाटील, पं.स. माजी सभापती प्रमोद ठाकूर यांनी कुसुंबळे येथील त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
अशोक पाटील हे आयुष्यभर शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनच राहिले. त्यांनी राजिप माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील तसेच दत्ता पाटील यांच्यासोबत एकनिष्ठेने कार्य केले. शेकापमधूनच त्यांनी 1987-88 मध्ये कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले. सर्पदंश, विंचूदंश, हाड मोडणे यावर आयुर्वेदिक रामबाण उपाय करण्यात ते प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या कार्यातून अनेक माणसे जोडली होती. त्याचा प्रत्यय म्हणूनच त्यांच्या अंत्यविधीसाठी परिसरातील जवळजवळ 1500 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुशिला, मुलगा प्रशांत, संतोष, संजय, मुलगी सुष्मा भगत, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अशोक पाटील हे कृषीवल पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांचे काका होत. त्यांचे दशविधी कार्य 11 ऑगस्ट रोजी, तर तेरावे रविवार, दि.14 ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी कुसुंबळे येथे सकाळी 10 वाजता होणार आहेत.