विजयभाऊ पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीच्या पत्रानंतर आंदोलन स्थगित

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शासनाच्या धोरणांविरोधात आक्रमक झालेल्या मिनिडोअर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांसह संघटनेचे पदाधिकारी आणि नातेवाईंकांनी झटापट करुन त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखून धरल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला शासनाकडून 17 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे पत्र दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातील सर्व मिनिडोअर चालक मालकांनी वाहतूक बंद ठेवल्याने प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. दहावीच्या परिक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांचाही यात खोळंबा झाला होता.

मिनीडोअर चालकांचे प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने रायगड जिल्ह्यातील संतप्त मिनीडोअर चालकांनी आक्रमक भूमिका घेतली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःच्या रक्ताने लिहीलेले निवेदन शासनाला देत गुरुवारी 16 मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. सदर निवेदन दिल्यानंतर दोन दिवस विजयभाऊ पाटील हे अज्ञात स्थळी गेले होते. त्यांचे फोनही बंद होते. आत्मदहनाच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगत नजर ठेवली होती. मात्र पोलिसांना चकमा देत विजयभाऊ पाटील यांनी वेशांतर करुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजर झाले. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तसेच मिनीडोअर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि विजयभाऊ यांच्या पत्नी यांनी त्यांच्याबाजूने कडे करीत त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखून धरले.

यावेळी सर्व आंदोलक आक्रमक झाले होते. सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी रोखून धरले होते. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः बाहेर येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बराच वेळ जिल्हाधिकारी येत नसल्याने आक्रम झालेल्या विजयभाऊ पाटील यांच्या सह आंदोलकांनी प्रवेशद्वारावर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले होते. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील, दिलीप भोईर, प्रमोद पाटील आदी शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शिष्टमंडळाला शुक्रवार दि. 17 मार्च रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे लेखी पत्र देण्यात आले. त्यानुसार सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

वेशांतर करुन आत्मदहनाचा प्रयत्न
आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर दोन दिवस अज्ञात स्थळी गेलेल्या जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील पोलिसांना चकमा देत वेशांतर करुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजर झाले. कोणाला काही कळण्याच्या आत त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तसेच मिनीडोअर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आणि विजयभाऊ यांच्या पत्नी यांनी त्यांच्याबाजूने कडे करीत त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखून धरले.

Exit mobile version