| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळी दरम्यान मिठाई विक्रेत्यांकडून भेसळयुक्त मिठाईची विक्री करण्यात येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. त्यातच आता सुप्रसिद्ध मॉलमध्ये एक्सपायरी डेट निघून गेलेल्या मिठाईची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कळंबोली परिसरात ‘काजू कतली’ संदर्भात एक तक्रार समोर आली आहे. येथील एका ग्राहकाने आपल्या जवळच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला दिवाळी भेट म्हणून दिलेल्या प्रसिद्ध कंपनीच्या काजू कतलीच्या पाकिटावर एक्सपायरी डेट होऊन गेल्याचा ग्राहकाचा आरोप आहे.
ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ही मिठाई शनिवारी (दि.18) कळंबोली येथील एका प्रसिद्ध सुपर मॉल मधून विकत घेतली होती. घरी आल्यानंतर पाकिटावर छापलेली तारीख तपासली असता 13 ऑक्टोबर ही एक्सपायरी डेट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे चौकशी केली आणि खरेदीचे बिलही सादर केले. या प्रकरणाची सुपर मॉल व्यवस्थापनाने दखल घेतली आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, ग्राहकाने दाखवलेले बिल आमचेच आहे; परंतु, ते उत्पादन आमच्याकडून खरेदी केल्याचे स्पष्ट होत नाही. मात्र, आम्हाला दाखवण्यात आलेली एक्सपायर झालेली मिठाई खरोखर आमच्याकडूनच दिला गेली आहे का? याची खात्री करावी लागेल, अशी प्रतिक्रिया व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. या घटनेनंतर स्थानिक ग्राहकांमध्ये खाद्यपदार्थांची तारीख तपासण्याबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य स्थिती जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







