तप्त उन्हात रस्त्यावर बसून भाजीची विक्री

विक्रेत्यांकडून भाजीमंडई करण्याची मागणी

| तळा | वार्ताहर |

तळा बाजारपेठेत तप्त उन्हात गावठी भाजी विक्रेत्यांना बाजारपेठेतील दुकानदारांच्या आडोशाला सावलीत बसावे लागत असल्याने तळा नगरपंचायतीकडून भाजी मंडईची व्यवस्था व्हावी, अशी मागणी या भाजी विक्रेत्यांकडून केली जात आहे.

तळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावठी भाजी लागवड केली जाते. बाजारपेठेत गावठी भाजीला मोठी मागणी असल्याने विविध प्रकारच्या या गावठी भाज्या शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. परंतु, बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने या भाजी विक्रेत्या शेतकर्‍यांना दुकानांच्या आडोशाला तसेच रस्त्याच्या कडेला बसून आपल्या मालाची विक्री करावी लागते. सकाळी दहा वाजताच कडक उन्हाची तीव्रता वाढत असल्याने स्वच्छ ताजी भाजी कोमजलेल्या अवस्थेत दिसते. तसेच बाजारपेठेत रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने भाजी विक्रेत्या शेतकर्‍यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तळा नगरपंचायतीने भाजी विक्रीसाठी शेतकर्‍यांना स्वतंत्र मंडई उपलब्ध करून दिली तर नगरपंचायतीला भाडेही सुरू होईल, शिवाय खेड्यापाड्यातून येणार्‍या या भाजी विक्रेत्या शेतकर्‍यांना स्वाभिमानाने आपला माल विक्री करता येईल. त्यामुळे तळा बाजारपेठेत भाजी मंडईची व्यवस्था करण्याची मागणी शेतकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version