। तळा । प्रतिनिधी ।
तळा बाजारपेठेत शेतकर्यांना आपल्या भाजीचा माल हा रस्त्यावर विक्री करावा लागत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने शहरात भाजी मंडई उभारावी, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. तळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावठी भाजी लागवड केली जाते. बाजारपेठेत गावठी भाजीला मोठी मागणी असल्याने विविध प्रकारच्या या गावठी भाज्या शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात. परंतु, बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने या भाजी विक्रेत्या शेतकर्यांना भर उन्हात दुकानांच्या आडोशाला तसेच रस्त्याच्या कडेला बसून आपल्या मालाची विक्री करावी लागते. सकाळी दहा वाजताच कडक उन्हाची तीव्रता वाढत असल्याने स्वच्छ ताजी भाजी कोमजलेल्या अवस्थेत दिसते.तसेच, बाजारपेठेत रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने भाजी विक्रेत्या शेतकर्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.