। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील आदिवासी चिंचवली तर्फे अतोणे ते कांदळे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? असा येथील नागरीकांना पडला आहे. त्यामुळे या मार्गानी प्रवास करणार्या विद्यार्थ्यांसहित नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
अतिशय दुर्गम भागातील चिंचवली तर्फे अतोणे ते कांदळे बेलवाडी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या मार्गाने विठ्ठलवाडी हायस्कूल येथे जाणारा कांदळे बेलवाडी येथील असंख्य विद्यार्थी तसेच कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिक या मार्गाने प्रवास करीत आहेत. या रस्त्याला असणारी वेडीवाकडी अवघड वळणे, रस्त्याच्या आजूबाजूला असलेली झाडंझुडपे यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. शिवाय अरुंद असणार्या रस्त्यामुळे वाहन चालवतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याच्या कामाची जाहिरात सप्टेंबर 2022 रोजी देण्यात आली असून या रस्त्याचे काम सिद्धिविनायक कन्ट्रक्शन कंपनीने ठेका मिळवला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी होऊन दोन वर्षापेक्षा जास्त दिवस होऊन गेले तरी अद्याप ही या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. मग या निस्कृष्ठ दर्जाच्या रस्त्यामुळे एखाद्याचा नाहक बळी गेल्या नंतर या रस्त्याचे काम केले जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया या मार्गानी प्रवास करणार्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.