52 जणांनी घेतला सहभाग
। पाली/वाघोशी । वार्ताहर ।
सुधागड संघर्ष संस्थेतील तरुणांनी रायगड प्रदक्षिणेप्रमाणे शिवजयंतीनिमित्त बुधवारी (दि.19) सकाळी 6 वाजता सरसगड प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधागड, पालीसह पुण्यातील तब्बल 52 लहान मुले, तरुण, प्रौढ व प्रशिक्षित ट्रेकर्सने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. दरम्यान, सरसगडाच्या भोवतालच्या ऐतिहासिक व नैसर्गिक परिसराची माहिती त्यांना मिळाली.
सरसगड प्रदक्षिणेची पहिली मोहीम अतिशय उत्तमपणे संपन्न झाली. सुधागड संघर्ष संस्थेतर्फे प्रदक्षिणा सुरु होण्यापूर्वी गडाचा इतिहास सांगण्यात आला होता. तसेच नियम, अटी व शर्ती समजावण्यात आल्या. संस्थेतील सदस्य अरविंद दंत, कपिल पाटील, अमित निंबाळकर, प्रदीप गोळे व मिलिंद गोळे यांनी आठवड्यापूर्वी केलेल्या प्राथमिक प्रदक्षिणेमुळे व उत्तम व्यवस्थापनामुळे ही प्रदक्षिणा यशस्वीपणे पार पडली. प्रदक्षिणेदरम्यान गडाचा इतिहास आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक तसेच प्रेक्षणीय स्थळांची माहिती देण्यात आली. अवघड, खडतर आणि तीव्र चढ-उतार असलेला हा मार्ग सर्वांनी साहसाने आणि जिद्दीने पादाक्रांत केला. सुरक्षेच्या सर्व उपाय योजना करून प्रदक्षिणा पुर्ण केली. प्रदक्षिणेकरिता नोंदणी शुल्क व्यतिरिक्त अमोल मोरे, विक्रांत चौधरी, मंगेश लखीमळे, विनय मराठे यांनी आर्थिक सहकार्य केले. तर, योगेश सुरावकर यांनी प्रशस्तीपत्र, परेश चौधरी यांनी प्रथमोपचार करिता सहकार्य केले.
प्रदक्षिणा पुर्ण झाल्यानंतर संस्थेकडून प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. या प्रदक्षिणेकरिता पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी पालीस कॉन्स्टेबल सुर्यवंशी यांना ट्रेकर्सच्या सुरक्षेसाठी व लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. शेवटी सर्व ट्रेकर्स, ज्येष्ठ नागरिक आणि देणगीदाते या सर्वांचे आभार मानून प्रदक्षिणेची सांगता करण्यात आली.