कल्पतरू विरोधात लाड कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून
। कर्जत । प्रतिनिधी ।
शांत सय्यामी समजले जाणारे कर्जत विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड हे पुन्हा येकदा शेतकर्यांसाठी अधिकार्यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गुरूवारी (दि.20) कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून आंदोलन सुरू केले आहे. पोलीस अधिकार्यांच्या विरोधात लाड यांनी उचललेल्या या पावलामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पळसदरी जवळील नांगुर्ले येथील शेतकर्यांची जागा येथील कल्पतरू या गृहप्रकल्प कंपनीने लाटल्याने लाड आक्रमक झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत नांगुर्ले-तिघर-वर्णे परिसरात कल्पतरू कंपनीचा बंगलो प्लॉटिंगचा सुमारे 150 एकर जमिनीमध्ये गृहप्रकल्प बांधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कंपनीने येथील शेतकर्यांना विचारात न घेता परस्पर जागा हडप केल्याचा आरोप बाधित शेतकर्यांनी केला होता तर कंपनीने आपलीं जागा शासकीय नियमानुसार मोजून घ्यावी म्हणून शेतकरी सांगत आहेत. परंतु, कंपनी मुजोरगिरी वापरत पोलीस प्रशासन व महसूल विभागाला हाताशी धरून शेतकर्यांवर दबाव आणत आहेत. सध्या येथील अपंग शेतकरी असलेले पांडुरंग शिर्के यांची जागा देखील कल्पतरू कंपनीने हडप केली असून शेतकर्यांची व्यथा पोलीस प्रशासन ऐकण्यास तयार नाही. दरम्यान, हा प्रकार गेली दोन तीन वर्षे सुरू असून यामध्ये नांगुर्ले, तिघर, वर्णे या गावातील वीसहून अधिक शेतकर्यांवर दबाव टाकून कंपनीने जागा हडप केलेली आहे. नुकताच तीन दिवसांपूर्वी कंपनीकडून शेतकरी पांडुरंग शिर्के यांच्यावर दमदाटी करण्यात आल्याने शिर्के यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यास गेले असता, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुरेंद्र गरड यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. तर कंपनी प्रशासनाला सहकार्य करीत शेतकर्यांवर दबाव टाकण्यात येत आहे.
पांडुरंग शिर्के हे माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड यांचे जवळचे विश्वासू सहकारी आहेत.शिर्के यांनी लाड यांच्याकडे आपली कैफियत मांडली असता लाड यांनी तहसीलदार,पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा देखील केली, परंतु शेतकर्यांच्या पाठीशी प्रशासन उभे राहत नसल्याने अखेर सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या पायरीवर आज गुरुवार दि.20 फेब्रुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आंदोलन सुरू केले असून ते झोपून आहेत. दरम्यान अधिकार्यांच्या विरोधात लाड यांनी टोकाचे पाऊल उचल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली असून पोलीस प्रशासन हादरून गेले आहे. यावेळी लाड यांनी जो पर्यंत शेतकर्यांना न्याय मिळत नाही किंवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भेटायला येत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सोडणार नाही म्हणून सांगितले.दरम्यान लाड यांच्या आंदोलन ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
एकूणच माजी आमदार तथा भाजप नेते यांनी कल्पतरू कंपनी विरोधात सुरू केलेले आंदोलन चर्चेत आले आहे.याही अगोदर लाड यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.एकीकडे कल्पतरू या गृहप्रकल्पात स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे समजते. तर सुरेश लाड भाजप म्हणून एकीकडे सत्तेत असताना त्यांना करावे लागलेले आंदोलन यामुळे आता तालुक्यात चर्चा पसरली.
गेली चार वर्षे आम्ही आमच्या हक्काच्या मागणीसाठी लढा देतो. कंपनी आमच्यावर दादागिरी, हुकूमशाही वापरत असून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर दबाव आणत आहे. कंपनीने 15 वर्षे पूर्वी प्रायव्हेट सर्वे करून जागेची मोजणी केली आहे. आता कंपनी शेतकर्यांच्या जागा बळकावत असून, शेतकर्यांवर दबाव टाकत आहे.
पांडुरंग शिर्के,
शेतकरी