75 केंद्रांमध्ये 37 हजार 368 विद्यार्थी बसणार; गैरप्रकार रोखण्यासाठी पाच भरारी पथके सज्ज
। अलिबाग । प्रतिनिधी ।
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील 75 केंद्रामध्ये 37 हजार 368 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात चार ठिकाणी संवेदनशील केंद्र आहेत. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर तो दिवस उजाडला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. शुक्रवारपासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मराठी विषयाचा पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, बैठे पथक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, विशेष महिला भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक या पथकांचा समावेश आहे.
अशी असणार परीक्षा केंद्रावर नजर
पक्षेच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शैक्षणिक संस्थाचे प्रमुख यांची कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनधिकृत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर मुलींच्या कॉपी तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेच्या महिला कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हीडीओ रेकॉर्डींग करण्याच्या सुचना केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तदेखील ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.