| रायगड | खास प्रतिनिधी |
पेण आणि सुधागड तालुक्यात बुधवारी (दि.19) रात्री जमीन हादरल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. परंतु, सदरची घटना भूकंप नसल्याचा दावा रायगड जिल्हा प्रशासनाने केला आहे. भारतीय हवामान विभाग मुंबई तसेच सातारा-कोयनानगर येथील भूमापन केंद्रावर अशा कोणत्याही भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आढळून आले आहे. या घटनेचे पुणे येथील भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले आहे.
पेण तालुक्यातील तिलोर, सायमाळ, झापडी, सिंधळाचीवाडी आणि वरवणे रात्री 22.10 वा. ते 23.45 वा. दरम्यान जमीन हादरल्याची सलग चार वेळा घटना घडली. तसेच सुधागड तालुक्यातील महागाव, भोप्याचीवाडी, देऊळवाडी आणि कवेळेवाडी येथे भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान घडली होती. अचानक जमीन हादरल्याने ग्रामस्थांना वाटले भूकंप झाला. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली होती. या ठिकाणी सुधागडचे तहसीलदार यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. सदर घटनेत काही घरांचे किरकोळ नुकसान झाले असून, जीवितहानी झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.