। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघरमधील एका नामवंत गृहनिर्माण सोसायटीत सुरू असलेल्या दुरुस्ती कामातील कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आपला एक डोळा गमवावा लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर उपनगरातील सेक्टर 4 येथील रेलविहार गृहनिर्माण सोसायटीमध्ये इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सोसायटीत राहणारे 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आपल्या घराजवळ असताना अचानक कामासाठी वापरण्यात येणारा बांबू उडून त्यांच्या चेहऱ्यावर आदळला. या अपघातात त्यांच्या डोळ्याला आणि हनवटीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमी ज्येष्ठ नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले असले तरी या दुर्घटनेत त्यांचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खारघर पोलिसांनी कंत्राटदार विरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ नागरिकाने गमावला डोळा
