जेष्ठ पत्रकार नवीन सोष्टे यांचे निधन

पत्रकारितेतील एक पर्व संपले
वाकण | वार्ताहर |
नागोठणे येथील जेष्ठ पत्रकार नवीनचंद्र नारायण सोष्टे यांचे वयाच्या 69 व्या वर्षी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी( 22 जुलै) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोरोना संसर्गमुळे निधन झाले. गेले 17 दिवस नवीनचंद्र सोष्टे यांनी कोरोनाशी जिकरीचे झुंज दिली. नवीनचंद्र सोष्टे हे कोरोना संसर्गामुळे अलिबाग येथील सामान्य रुग्णालयात दाखल झाल्याचे समजल्यानंतर लगेचच कर्तव्यतत्पर आमदार अनिकेत तटकरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर व्यक्तिशः लक्ष ठेवण्याच्या सुचना डॉ. माने यांना दिल्या होत्या.

पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांच्या निधनाने नागोठणेसह रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेतील मोठा आधार गेला असल्याची प्रतिक्रिया नागोठणेकर नागरिकांनी व्यक्त केली. नवीनचंद्र सोष्टे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नात, नातू, असा परिवार आहे.

नविनचंद्र सोष्टे यांनी वयाच्या 18 व्या वर्षांपासून पत्रकारिता सुरु केली. तेव्हापासून रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेत ते एक झपाटलेले व्यक्तिमत्व होते. पत्रकारिता करत असताना सर्वपथम सकाळ मध्ये 30 वर्षे नंतर सामना, सागर, कृषिवल, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, रायगड (रत्नागिरी) टाइम्स या वृत्तपत्रांध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले होते. या व्यतिरिक्त नागोठणे येथे त्यांची शुभेच्छा प्रकाशन नावाने प्रिंटिंग प्रेस व्यवसायही त्यांनी अनेक केला होता. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदही त्यांनी सहा वर्षे भूषवले होते. आत्तापर्यंत त्यांनी 22 पुस्तके लिहिली. त्यामध्ये आंबकाठवरील अश्रू या पुस्तकाला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी कडून गौरविण्यात आले होते. हे पुस्तक यनिव्हर्सिटी मध्ये अभ्यासासाठीही ठेवण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. अशा या नागोठण्यातील सुपुत्राला कोरोनाने आयुष्याततून एक्झिट घ्यावयास लावल्याने नागोठण्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पत्रकारितेचे एक पर्व संपल्याची भावना संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version