| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ ॲड. एम.एम. अर्थात महादेव उर्फ बाळासाहेब पारकर (72) यांचे मंगळवारी (दि.28) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने विधी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक अनुभवी, अभ्यासू मार्गदर्शक गमावल्याचे दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते स्व. ॲड. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिलीची सुरुवात केली. ॲड. दत्ता पाटील यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून ॲड. पारकर यांनी कायद्याचा सखोल अभ्यास केला. फौजदारी कायद्यातील अभ्यासपूर्ण कामगिरीमुळे वकिली क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण केले होते. गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये बारकाईने अभ्यास करून आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचे एक वेगळे कौशल्य त्यांच्यामध्ये होते. त्यामुळे विधी क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. ॲड. पारकर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत राजकीय, सामाजिक क्षेत्रासह विधी क्षेत्रातून शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ॲड. पारकर यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील वरसोली स्मशानभूमीत करण्यात आला.







