खळबळजनक! दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कर्जतमध्ये गोळीबार; तिघांना अटक

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील पोटल वाडी मधील मुस्लिम धर्मीय व्यक्तिंमधील पूर्व वैमनस्य मधील वाद शिगेला पोहचला आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी बुधवारी (दि.1) रात्री साडे आठ वाजता दहशत माजवण्यासाठी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, दोघे फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील गुलाम मालदार आणि माजी सरपंच इस्माईल मालदार या दोघांमध्ये गेली अनेक वर्षे वाद आहेत. पोटल ग्रामपंचायत मधील वाडीमध्ये राहणाऱ्या या दोन्ही मालदार व्यक्तिंमधील वाद विकोपाला गेला. गुलाम मालदार यांचा मुलगा पुण्यावरून पोटल येथे आला होता. जमिनीच्या जागेवरून निर्माण झालेला वाद वाढला आणि त्यानंतर मुत्तीश गुलाम मालदार याने आपल्याकडे असलेले गावठी कट्ट्यामधून हवेत गोळीबार केला. घरगुती वादातून दहशत माजवण्यासाठी मुत्तीश याने गोळीबार केला. ग्रामस्थांनी या गोळीबाराची माहिती कर्जत पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. घरगुती वादातून निर्माण झालेला हा वाद गोळीबारा पर्यंत पोहचला असून, ग्रामस्थांनी तिघांना स्वतः पकडून ठेवले होते आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करून ठेवला. या घटनेत वाद निर्माण झाल्यानंतर झालेला गोळीबार लक्षात घेऊन पोलिसांनी पळून गेलेल्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तर पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी पाहणी करून स्थानिकांसोबत चर्चा केली.

Exit mobile version