| नेरळ | प्रतिनिधी |
हुतात्मा भाई कोतवाल, क्रांतिकारक गोमाजी पाटील यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील पाली, पोटल, हुमगाव या भागातील अनेक सहकारी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्या स्वातंत्र्यसैनिक यांच्या नातेवाईक, कुटुंबियांचा सन्मान सिद्धगडाचा छावा या संघटनेकडून माझी माती माझा देश उपक्रमात करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा येथे हुमगाव येथे आझाद दस्ता लढ्यामधील 17 जणांचा विशेष सन्मान करण्यात आला.
देश पारतंत्र्यात असताना भाई कोतवाल, गोमाजी पाटील आणि भगत मास्तर यांना भूमिगत राहून मदत करणाऱ्या कर्जत तालुक्यातील पाली परिसर महत्वाची भूमिका बजावत होता. 1942 मध्ये भूमिगत क्रांतीकारांचे मोठे केंद्र असलेले पोटल पाली गाव तालुका कर्जत हुतात्मा भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या आझाद दस्त्यात पोटल पाली, हुमगाव येथील तरुण सहभागी झाले होते. या भागातील तरुणांनी क्रांतीची मशाल हातात घेऊन बलाढ्य ब्रिटिश सरकारला कडवा प्रतिकार केला होता. भारत मातेच्या स्वतंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी रक्ताचे पाणी केलं, त्या वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप यातना सहन कराव्या लागल्या त्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. रायगड जिल्हा परिषद शाळा पालि कातकरवाडी येथे सिद्धगडचा छावा संघटनेच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यातील पोटल पाली, हुमगावमधील 17 क्रांतीकारांच्या नातेवाईकांचे गौरव सन्मान करण्यात आला.
क्रांतिकारांच्या कुटुंबियांचा सन्मान सिद्धगडचा छावा कर्जत या संघटनेचे माध्यमातून अध्यक्ष मंगेश ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सन्मान केला. पाली गावाचे सरपंच संजना पवार, उपसरपंच शिवाजी कुंभार, तसेच माजी सैनिक नामदेव कुंभार, नितीन शिंदे शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख नारायण सोनवणे, जेष्ठ ग्रामस्थ बागडे गुरुजी, शिक्षिका अर्चना देशमुख, अंगणवाडी सेविका रत्नप्रभा शिंदे, कांचन दळवी यांची प्रमुख उपस्थितीत होती. या कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे उपाध्यक्ष कैलास वाघ, अक्षय हिरे, महेश कदम, दिलीप वाघ, सुमित गुप्ता, शिवाजी नाईक, ऋतुजा ठाकूर यांनी केले होते. तर कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.