समुद्रकिनार्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येणारे पर्यटक हे श्रीवर्धन येथे येताना त्यांची चारचाकी वाहने किंवा बस घेऊन पर्यटनासाठी येत असतात. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहली देखील बसेस घेऊन या ठिकाणी येत असतात. मात्र, येणार्या असंख्य पर्यटकांची वाहने पार्क करण्यासाठी श्रीवर्धन समुद्रकिनार्याजवळ कोणत्याही वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीच्या समस्येला येथे येणार्या पर्यटकांसह स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे.
श्रीवर्धनमध्ये सुट्टीच्या हंगामात मोठ्या प्रमाणवार पर्यटक येत असतात. तसेच, सध्या शैक्षणिक सहलींचे देखील मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. या ठिकाणी येताना पर्यटक आपल्यासोबत चारचाकींसह मिनी बसपासून माठ्या बसेस घेऊन येत असतात. मात्र, श्रीवर्धन समुद्रकिनार्यावर गाडी पार्कींगसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे जिथे जागा भेटेल तिथे गाडी पार्क केली जात आहे. त्यामुळे दुसर्या गाड्यांना समुद्रककिनारी येताना मोठा अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागातो. त्यामुळे येथील शासकीय विश्रामगृहाच्या जवळ पोलिसांकडून पर्यटकांची वाहने अडवून रवींद्र ना. राऊत विद्यालयाच्या पटांगणामध्ये उभी करण्यात येतात. विद्यालयाचे हे पटांगण सोडल्यास श्रीवर्धन समुद्रकिनारी गाड्या लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध नाही. तसेच, हे पटांगण देखील वाहनांने भरल्यास पर्यायाने त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडीचा प्रकार घडतो. त्यातून अनेक वेळा वाद देखील उद्भवतात.
अंतयात्रेला देखील कोंडीचे ग्रहण
मठाच्या गवंडामध्ये असलेल्या अवधूत मंदिरापासून ते श्रीवर्धन नगर परिषदेची स्मशानभूमी यादरम्यान पर्यटकांची वाहने उभी असतात. तसेच, अनेक पर्यटक याच ठिकाणी जेवण बनवून तेथेच जेवायला बसतात. दरम्यान, कोणीही व्यक्ती मृत्यू पावल्यास या ठिकाणाहून अंत्ययात्रा जात असतात. मात्र, अंत्ययात्रा घेऊन जाणार्या नागरिकांना देखील मध्येच पार्क केलेल्या वाहनांमुळे आणि पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणवर त्रास सहन करावा लागतो.
रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव बासनात
ज्या ठिकाणी नागरिकांना प्रवास करण्यासाठी पाच मिनिटे लागतात त्या ठिकाणी अर्धा तास घालवावा लागत आहे. श्रीवर्धन शहरातील रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे बासनात पडून आहे. नगर परिषदेने तसेच लोक प्रतिनिधींनी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील रस्ते लवकरात लवकर रुंद करून घ्यावे. जेणेकरून येणार्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना देखील सोयीचे होईल.