| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून फक्त 3 किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तसेच यामुळे परिसरात कावळे, घारी यासारखे पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
कोणत्याही विमानतळाच्या 10 किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये असा नियम आहे. असे असतानाही नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून 3 किमी अंतरावरील उलवे परिसरातील सेक्टर 19 येथे प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री केली जात आहे. यामुळे नागरी विमान वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. दरम्यान, मांस विक्री केल्यामुळे या परिसरात कावळे, घार यांच्यासह सर्व प्रकारचे पक्षी आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीबरोबरच इतर पक्ष्यांना यांचा अधिक धोका होऊ शकतो. यामुळे स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. उरण तालुक्यातील चिरनेर येथे जानेवारी महिन्यात कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. यामुळे तालुक्यातील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी पक्षी मारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.