| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन 2024 मध्ये 39 गुन्हयातील एकण 1 कोटी 61 लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. नशा मुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणुन आज बुधवार (दि.26) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकुण 40 गुन्हयातील जप्त करण्यात आलेले 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक याच्या हस्ते शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी (तळोजा) या ठिकाणी नष्ट करण्यात आला.
सन 2023 व 2024 मध्ये अंमली पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरोधात 1143 गुन्हे दाखल करुन 1743 आरोपींना अटक करण्यात आली असुन, त्याच्याकडुन एकुण 56 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे. त्यामध्ये एकण 111 आफ्रिकन नागरीकांना अटक करण्यात आली असुन, त्यांचेकडुन 38 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच सन 2023 व सन 2024 मध्ये नवी मुंबईमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या 1131 आफ्रिकन नागरीक व 224 बांग्लादेशी नागरीकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधील एकुण 1128 आफ्रिकन नागरीकांना भारत देशातुन हद्दपार करून परत पाठविले आहे.
शासनाच्या धोरणानुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतुन व पुढाकाराने नशा मुक्त नवी मुंबई अभियानाची सुरवात दिनांक 08 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. “नशा मुक्त नवी मुंबई” कार्यक्रमाचा बॅन्ड ॲम्बेसेडर म्हणुन प्रसिद्ध सिने अभिनेता जॉन अब्राहम याची खास नेमणुक करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये नवी मुंबई परिसरातील शाळा-कॉलेज/सोसायटीमधील नागरीकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन, त्यांची अंमली पदार्थाचे दुष्परिणामाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली. तसेच अंमली पदार्थाचे अनुषंगाने नागरीकांना माहीती देण्याकरीता 8828-112-112 हा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स, होर्डीग्ज लावण्यात आले. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील शाळा व कॉलेजमध्ये, तसेच रहिवाशी सोसायटी, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वेळोवेळी जाऊन तेथे विद्यार्थी व नागरिकांमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परिणामाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येत आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी ही सरकार मान्य वेस्ट डिस्पोजल कंपनी असून, या कंपनीमध्ये केंद्रसरकार व राज्य सरकार यांच्या विविध विभागांचे वेगवेगळया प्रकारचे मुद्देमाल नष्ट केले जातात.