। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली नगरपंचायतीकडून काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काही काळानंतर हेच खड्डे पुन्हा शहराच्या रस्त्यांवर उघडपणे दिसू लागले आहेत, त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचा संताप वाढला आहे.
शहरातील गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, हट्टाळेश्वर चौक, सुख सागर सोसायटीसमोर, आणि अन्य अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. विशेषतः सुख सागर सोसायटीसमोरील खड्डा इतका खोल व मोठा आहे की, वाहनांना अक्षरशः आपटावे लागते. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, नगरपंचायतीने केलेले खड्डे भरण्याचे काम ‘चार दिवसांची चांदणी आणि पुन्हा अंधार’ अशा म्हणीप्रमाणे होते. रस्त्यांची दुरवस्था आणि अपयशी दुरुस्ती यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपंचायतीने ठोस व शाश्वत उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी वाहनचालक आणि पाली शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. फक्त ‘तात्पुरत्या ठिगळाने’ नव्हे तर गुणवत्ता आणि दीर्घकालीन दृष्टीने रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, असा आग्रह नागरिकांनी धरला आहे.
तसेच, पाली नगरपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून सर्व रस्त्यांची पुनर्तपासणी करून गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक जनतेकडून व्यक्त केली जात आहे.