सेवापूर्ती म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात: अश्विनी जंगम

| आगरदांडा | प्रतिनिधी |

सेवापूर्ती म्हणजे नोकरीतील एका पर्वाचा शेवट नसून आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांचे भविष्य घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो, असे प्रतिपादन मुरूड पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी जंगम यांनी केले.

मुरूड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेत 37 वर्षे ज्ञानदानाचे कार्य करणारे आदर्श शिक्षक संजय झिराडकर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन एकदरा येथील श्रीराम मंदिर प्रांगणात उत्साहात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. संजय झिराडकर यांनी 37 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, अशा शब्दांत अश्विनी जंगम यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाची सुरुवात झिराडकर कुटुंबीयांच्या वाजतगाजत काढलेल्या मिरवणुकीने झाली. शिक्षिका कीर्ती भगत व शिघ्रे केंद्रातील शिक्षिकांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. शाळकरी मुलींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले, तर गायक नितीन मिठागरी यांनी सुमधुर गायनातून शुभेच्छा दिल्या. मुलगी वेदा व मुलगा अक्षय यांनी वडिलांच्या 37 वर्षांच्या समर्पित सेवेला उजाळा देत भावनिक मनोगत व्यक्त केले. पत्नी ग्रामसेविका स्नेहा झिराडकर यांनी आयोजकांचे आभार मानले. सत्कारमूर्ती संजय झिराडकर यांनी विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालेल्या आठवणी सांगितल्या. तसेच शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी अश्विनी जंगम यांच्या हस्ते झिराडकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समिती उपसभापती अश्विनी जंगम, सरपंच ज्योती वाघरे, पत्नी ग्रामसेविका स्नेहा झिराडकर, वेदा झिराडकर, अक्षय झिराडकर, केंद्रप्रमुख कीर्ती भगत, शिघ्रे-आगरदांडा केंद्रातील शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version