नवरात्र उत्सव मंडळाचा सलग तिसऱ्या वर्षी उपक्रम; वीसहून अधिक तरुणांचे श्रमदान
| अलिबाग | प्रतिनिधी |
केवळ देवदर्शन करून परत जाण्यापेक्षा देवस्थान स्वच्छ ठेवणे हीच खरी देवीची सेवा असल्याचा संदेश देत नवरात्र उत्सव मंडळ, रांजणखार नाका यांनी एकविरा देवी देवस्थान परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. दरवर्षीप्रमाणे यंदाही 17 जुलै रोजी मंडळाच्या सुमारे वीस सदस्यांनी श्रमदान करत पाच पायरी परिसर तसेच शक्तीपीठ मंदिरासमोरील संपूर्ण परिसर स्वच्छ करून लखलखीत केला.
मंडळाचे सदस्य स्वच्छता करत असताना अनेक भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ”आज तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले,” असे सांगत काही भाविकांनीही स्वयंस्फूर्तीने श्रमदानात सहभाग घेतला. यामुळे हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक जनजागृतीचाही ठरला.

मोहिमेदरम्यान नारळ, हार विक्रेते, चिक्की-फरसाण विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिकांनी कचरा गोळा करण्यासाठी गोण्या उपलब्ध करून दिल्या. मात्र, ”आम्ही कचरा करायचा आणि तुम्ही येऊन उचलायचा, ही खेदाची बाब आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त करत प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. या श्रमदान मोहिमेत मंडळाचे मनोज पाटील, धनंजय पाटील, समीर पाटील, शंकर पाटील, जितेंद्र पाटील, आतिश म्हात्रे, राजेंद्र पाटील, रमेश भाऊ, गंगाधर पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
ट्रस्टकडून श्रमदात्यांचा गौरव
श्रमदानानंतर शक्तीपीठ मंदिरात ट्रस्टचे सदस्य साईनाथ देवकर यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. ''गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही सातत्याने करत असलेले श्रमदान आम्हालाही प्रेरणा देणारे आहे,'' असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सामाजिक कार्याची समृद्ध परंपरा
नवरात्र उत्सव मंडळाने आजपर्यंत रक्तदान, श्रमदान, पूरग्रस्तांना मदत, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, अन्नदान, पाणपोई व्यवस्थापन आणि वृक्षारोपण अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा वसा जपला आहे.
श्रमदात्यांना अल्पोपहाराचे सहकार्य
स्वच्छता मोहिमेनंतर श्रमदात्यांसाठी प्रधान अँड कंपनी आणि पलक ट्रेडिंग कंपनी, अलिबाग यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांना या दोन्ही संस्थांचे सातत्याने मोलाचे सहकार्य लाभत असल्याची माहिती मंडळाने दिली.







