अपूर्ण कामावर आश्वासनांचा पाऊस; कामाला वेग नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित माणगाव-इंदापूर बायपास गणेशोत्सवापूर्वी किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला होणार, असा दावा पुन्हा एकदा समोर आला असला तरी प्रत्यक्ष कामाची सद्यस्थिती पाहता हा दावा वास्तवापासून दूर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. गेली 17 वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आश्वासनांची मालिका सुरू झाली असून, प्रत्यक्ष कामाच्या गतीवर मात्र प्रश्नचिन्ह कायमच राहिले असून बायपासच्या कामाचा ब्रिजचे काम रेंगाळले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे एका महिन्यात कसे पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह उभारले जात असून, गणेशोत्सवापूर्वी एकरी मार्गीका सुरू होईल असे लोकप्रतिनिधी सांगून आश्वासनाचा पाऊस पाडत आहेत. त्यामुळे या मार्गावर तारीख पे तारीख मिळत आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच बायपासची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्याआधी अवघ्या महिनाभरापूर्वी मंत्री भरत गोगावले यांनीही याच प्रकल्पाची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला होता. त्या वेळीही कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही प्रत्यक्षात कामाचा वेग अपेक्षित पातळीवर पोहोचलेला दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या कोकणात मुसळधार पावसाचा हंगाम सुरू असून, अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावरील महामार्गाचे बांधकाम पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण मानले जाते. विशेषतः कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल आणि गोध नदीवरील पुलाचे काम अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी केवळ पीसीसी कॉलम उभे करण्यात आले असून मुख्य गर्डर, डेक स्लॅब आणि जोडरस्त्यांची कामे अद्याप बाकी आहेत. याशिवाय पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकणे आवश्यक आहे. मात्र, पावसाळ्यात अशा प्रकारचा भराव करणे अवघड असते. आवश्यक माती उपलब्ध करून ती वाहून आणणे, तिचे योग्य संपीडन करणे आणि त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होईल, या दाव्याबाबत अभियंते आणि स्थानिक जाणकारही साशंक असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष कामाची वस्तुस्थिती पूर्णपणे सांगत नसल्याचा आरोपही नागरिकांतून होत आहे. पाहणी दौऱ्यावेळी निवडक भागच दाखवले जातात, तर उर्वरित अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक पाहणी नंतर नवीन मुदत जाहीर होते; मात्र प्रत्यक्षात काम पूर्णत्वास जात नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्या 17 वर्षांत या प्रकल्पासाठी अनेक वेळा अंतिम मुदती जाहीर झाल्या. विविध सरकारे आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आश्वासने दिली; परंतु प्रत्येक वेळी मुदत पुढेच ढकलली गेली. त्यामुळे आता नागरिकांचा विश्वास केवळ घोषणांवर राहिलेला नाही. तारीख पे तारीख देऊन तात्पुरते समाधान केले जाते, मात्र काम मात्र, संथगतीनेच सुरू राहते, अशी टीका नागरिक करत आहेत.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा प्रवासी हंगाम मानला जातो. लाखो चाकरमानी मुंबई, पुणे, सुरत, ठाणे आणि इतर शहरांतून कोकणात परततात. अशा वेळी माणगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि अपूर्ण बायपास मुळे दरवर्षी मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवापूर्वी मार्ग खुला होईल, या घोषणेपेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. एकूणच, पाहण्या, बैठका आणि घोषणांचा वेग वाढला असला तरी प्रत्यक्ष बांधकामाची सद्यस्थिती, पावसाळ्यातील तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण पूल पाहता गणेशोत्सवापूर्वी बायपासची एकेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीकडेच कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सव आला की बायपासची आठवण आणि आश्वासनांचा पाऊस, हा गेल्या अनेक वर्षांचा ठरलेला पायंडा आहे. प्रत्यक्षात ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्थानिकांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे प्रश्न कायमच प्रलंबित राहतात. तसेच आमसभा ही या प्रश्नावर लावली गेली नाही पूर्वी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती असायची ती समिती अस्तित्वात नाही. त्या बैठकीत असे विषय व्हायचे, आता ते होताना दिसत नाही. आता केवळ आश्वासने नव्हे, तर ठोस कृती आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची वेळ आली आहे.
ज्ञानदेव पवार,
माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक, माणगाव







