। उरण । वार्ताहर ।
देशात बांगलादेशी घुसखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे देशाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने परप्रांतीयांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उरण पोलिसांनी द्रोणागिरी नोडमधील केलेल्या चौकशीत गामी ग्रुप या विकासकाच्या बांधकाम साईटवरील कामगार बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे.
उरण तालुक्यात द्रोणागिरी नोडसारख्या अनेक छोट्या-मोठ्या रहिवाशांच्या वस्त्या होत आहेत. तसेच उरण तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता तालुक्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार्याच्या माध्यमातून येथील भागात औद्योगिक विकासदेखील झापाट्याने होत आहे. नौदालाचे शस्त्रागार, तेल व नैसर्गिक वायू शुद्धीकरण प्रकल्प, देशातील सर्वात मोठे जवाहारलाल नेहरू बंदर प्राधिकरण, गॅस आधारीत वीज प्रकल्प, तेल साठवणूक प्रकल्प, भारत पेट्रोलिम सारखा गॅस वितरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तर बंदरावर आधारीत शेकडो कंटेनर यार्ड, फ्रेट स्टेशन या तालुक्यात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे उरण तालुका अतिसंवेदनशील बनला आहे. त्यात उरणला रेल्वे सुरू झाल्याने परप्रांतीयांना पळण्यासाठी सोयीचा मार्ग ठरु शकतो. यासाठी मुळेखंड, करंजा येथील शक्करपीर दर्ग्याजवळ तयार झालेली नवी वसाहत, डाऊरनगर येथील भाडेतत्वावर रहाणारे परप्रांतीय, चारफाटा येथे सकाळी जमा होणारे मंजूर, तालुक्यातील तसेच शहरांतील रस्त्यावर फिरणारे फेरीवाले, परप्रांतीय कुरिअर बॉय, बोरी स्मशानभूमी येथील अवैध वस्ती, भवरा येथील परप्रांतीयांची वस्ती, गावागावातील परप्रांतीय भाडोत्री या सर्वांच्या कागदपत्रांसह त्यांची सखोल चौकशी केली तर नक्कीच बांगलादेशी घोटाळा उघड होईल. मात्र मतांसाठी राजकीय पक्ष व त्यांचे नेतेमंडळी मौनव्रत धारण करून बसली आहेत.
उरण द्रोणागिरी नोड येथे गामी ग्रुप या विकासकाची बांधकाम साईट सुरु आहे. या साईटवरील संबंधित लेबर ठेकेदाराने आपल्या कामावर काही बांगलादेशी कामगार कामावर ठेवले असल्याची गुप्त माहिती उरण पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार उरण पोलीसांनी मंगळवारी सापळा रचून बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या कामगारांची तपासणी केली असता 7 बांगलादेशी पुरुष आढळून आले. या घुसखोरांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत असून अधिक तपास उरण पोलीस करत आहेत.