मुंबईत संशयिताला घेतलं ताब्यात
| मुंबई | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौर्यावर असून त्यानंतर ते दोन दिवसांच्या अमेरिका दौर्यावर रवाना होणार आहेत. दरम्यान, अमेरिका दौर्याआधी पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ल्याची धमकी देण्यात आली. 11 फेब्रुवारीला मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक कॉल आला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू, अशी धमकी देण्यात आली.
पंतप्रधानांच्या विमानावर हल्ल्याच्या धमकीचा कॉल गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी इतर संस्थांना याची माहिती दिली. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुंबई पोलिसांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला कॉल केला होता, तो चेंबूर परिसरात राहत होता. त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे. नरेंद्र मोदींना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नोव्हेंबर 2024 मध्ये मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमलाच धमकी देणारा फोन कॉल आला होता. त्याआधी 2023 मध्ये हरियाणातील एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल व्हायरल करत मोदींना गोळी मारण्याची धमकी दिली होती. तर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवियर नावाच्या व्यक्तीने धमकी दिली होती.