| पनवेल | वार्ताहर |
रबाळे पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या सुमारे 25 लाख रुपये किंमतीच्या 163 मोबाईल फोनचा शोध घेऊन, सदर मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अदिनाथ बुधवंत यांच्या हस्ते परत केले. यावेळी हरवलेले आणि चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.
गहाळ झालेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याकरिता केंद्र सरकारने सीईआयआर असे पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलचा वापर करुन नागरिकांच्या हरवलेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे, तपास पथकातील अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण पवार आणि त्यांच्या पथकाने हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते. या तपास पथकाने सीईआयआर पोर्टलचा वापर करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करुन 163 नागरिकांचे चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. बरेचसे मोबाईल फोन वेगवेगळ्या राज्यात वापरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यानंतर देखील पोलिसांनी अथक प्रयत्न करुन काही ठिकाणी स्थानिक पोलिसांची मदत घेवून सदर मोबाइल हस्तगत केले आहेत. दरम्यान, सीईआयआर पोर्टलच्या आधारे शोध घेतलेल्या सुमारे 25.10 लाख रुपये किंमतीचे 163 मोबाईल फोन संबंधित नागरिकांना रबाले पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांना परत करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे विशेष आभार मानले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सायबर सुरक्षा आणि मोबाईल बाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.