| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महामार्गावर कोन फाट्यावर असलेल्या क्रेझी बॉईजबारसमोर भीषण अपघाताची घटना आज बुधवार (दि.12) दुपारी घडली असून, यामध्ये बस चालकासह इतर तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाशिवली ते पनवेल भरधाव जाणारी एसटी बस ही झाडाला धडकली. बघणार्याला धडकी भरावी असेच या अपघाताचे दृश्य होते. झाडाला जोरात धडकल्यानंतर एसटी बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात बसच्या समोरील भागाचा अक्षरशःचक्काचूर झाला आहे. या भीषण दुर्घटनेत बस चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. बाकी प्रवासी सुखरूप असल्याचे वृत्त आहे. मात्र, या भीषण अपघाताने एसटी बसमधील प्रवासी चांगलेच भांबावले होते. साधारण 50 प्रवासी या बसमधून प्रवास करीत होते. अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि नवीन पनवेल ट्राफिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमींना मदतकार्य आणि वाहतुकीचे नियोजन केले. ही बस भरधाव वेगात येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. कोन गावातील या रस्त्यावर अनेक दुकाने आणि टपर्या आहेत. त्यामुळे झाडाला धडकून बस तिथेचपलटी झाली आणि सुदैवाने आसपासची दुकाने आणि टपर्या यामुळे बचावल्या. हायड्राच्या मदतीने एसटीबस रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली आहे.